ठाणे - पालिका आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांकडून ठाणे रेल्वे स्थानकांत अँटीजेन टेस्ट करीत असताना काही मुजोर रिक्षा चालकांनी आक्षेपार्ह वर्तन केले. हा प्रकार समजल्यानंतर सहआयुक्त प्रणाली घोंगे यांनी मुजोर रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे गुरुवारी काही काळ महिला कर्मचारी व रिक्षा चालकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केले.
पालिकेच्या महिला अधिकाऱ्याकडून असभ्य वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाच्या कानशिलात! - ठाणे सहआयुक्त प्रणाली घोंगे न्यूज
ठाणे महानगरपालिकेने बाहेरून आलेल्या परप्रांतीय मजुरांची मोफत अँटीजेन टेस्ट करून घेण्याची व्यवस्था ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटिसखाली केली आहे. महिला अधिकाऱ्यांसमोर उभे राहून अश्लील हावभाव करणे व अश्लील कॉमेंट पास करण्यापर्यंत रिक्षाचालकांची मजल गेली.
कोरोना काळात घरी गेलेले परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबईकडे मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता बळावली आहे. यावर तोडगा म्हणून ठाणे महानगरपालिकेने बाहेरून आलेल्या परप्रांतीय मजुरांची मोफत अँटीजेन टेस्ट करून घेण्याची व्यवस्था ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटिसखाली केली आहे. महिला अधिकाऱ्यांसमोर उभे राहून अश्लील हावभाव करणे व अश्लील कॉमेंट पास करण्यापर्यंत रिक्षाचालकांची मजल गेली. या घटनेची माहिती मिळताच कोपरी नौपाडा प्रभागाच्या सहआयुक्त प्रणाली घोंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रिक्षाचालकांना जाब विचारला. या बेशिस्त रिक्षाचालकांनी उलट महिला अधिकारी प्रणाली घोंगे यांच्याशी वाद घातला. संतापलेल्या सहआयुक्तांनी एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात मोठा गोंधळ उडाला. या सर्व प्रकारची माहिती मिळतच नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
सॅटिसखाली एक पोलीस चौकी स्थापन करण्याची जनतेची मागणी-
सॅटिसखाली नौपाडा पोलिसांची एक चौकी होती. तोपर्यंत बेशिस्त रिक्षाचालकांवर चांगलाच वचक होता. परंतु काही कारणास्तव ही चौकी येथून हटविल्यानंतर प्रवाशांना लुटण्याचा जणू त्यांना परवानाच मिळाला आहे. अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, थेट रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन प्रवाशांना जवळपास खेचत आणणे असले प्रकार येथे सर्रास पहायला मिळतात. याबाबत अनेकदा तक्रार करूनदेखील काहीही कारवाई न झाल्याने रिक्षाचालकांची मजल सहआयुक्तांशी पंगा घेण्यापर्यंत पोहोचली आहे. हे मुजोर रिक्षाचालक जर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असे वर्तन करत असतील तर सामान्य गोरगरिबांना दहशत माजवून कसे लुटत असतील याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर जरब बसावी म्हणून सॅटिसखाली एक पोलीस चौकी स्थापन करण्याची जनतेची मागणी लवकर पूर्ण व्हावी, असे अनेकांनी बोलून दाखविले.