ठाणे - ऑक्सिजन संपायला येतो तेव्हा खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना जाग येत असून आयत्यावेळी फोन करून आमच्या रुग्णालयातील ऑक्सिजन संपलाय असे सांगत आहेत. त्यामुळे कृपया करून ऑक्सिजन संपण्याच्या 4 ते 5 तास आधी आम्हाला माहिती द्या अशी सूचना ठाणे महापलिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत. रुग्णालयात कोणत्याही कारणास्तव दुर्घटना घडू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनेचा आढावा बैठक घेण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोविड-१९ उपचारादरम्यान कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन व विद्युत यंत्रणेचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश देतानाच सध्यस्थितीत कोविड- १९ उपचारासाठी जी पद्धत निश्चित करण्यात आली आहे, तिचा अवलंब करावा असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. शहरातील कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ऑक्सिजन पुरवठयासाठी महापालिकेच्या कोविड रूग्णालयावर तसेच खासगी रूग्णालयावर देखील मोठया प्रमाणावर ताण पडत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य ते उपचार देण्यासोबतच रूग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन सुयोग्य स्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे.
खासगी रूग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये तसेच रूग्णालयामधील अग्निशामक सुरक्षा, ऑक्सिजन तसेच विद्युत पुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनाने एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी तसेच ऑक्सिजन बाबतच्या अडचणीसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व डॉक्टरांना दिले.