ठाणे- महापालिकेचे आयुक्त विपिन मिश्रा यांनी आज पदभार घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार झाला आहे. ठाणे महापालिकेची 24 तास सुरक्षा करणाऱ्या रक्षकाचा कोव्हिड अहवाल सकाळी पाझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी जवळपास साडेपाच तास महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर झाडाखाली ताटकळत थांबावे लागले. शेवटी खासगी वाहनाने त्या रक्षकाला रुग्णालयात दाखल करावे लागले.
परिवहन बसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले आहे. त्या उभ्या असतानाही सुरक्षा रक्षकाला बस उपलब्ध होऊ शकली नाही, यासारखी दुसरी शोकांतिका नाही. दुसरीकडे कोव्हीडची आपतकालीन सेवा विभागातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होऊनही प्रशासकीय आरोग्यविभाग जागा होत नाही. फोन न उचलणारा अधिकाऱ्या वर्गाची माणुसकी कोव्हीडमध्ये हरवली आहे, का अशी वेदनादायी परिस्थिती संपूर्ण ठाणे शहरात दिसून येत आहे. अखेरीस मनसेच्या दणक्यानंतर एका खासगी गाडीतून सुरक्षारक्षकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
ठाणे शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येस आळा घालण्यास तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांना अपयश आले. त्यामुळे मंगळवारी त्यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी विपिन मिश्रा यांची नेमणूक करण्यात आली. मिश्रा यांच्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी सुरक्षारक्षकाची घटना घडणे म्हणजे अधिकारी वर्गाने त्यांना दिलेली ही मानवंदना आहे, का असा संतप्त सवाल मनसेचे महेश कदम यांनी केला.
काही दिवसांपूर्वी 85 रूग्णवाहिका ठाणेकरांच्या सेवेत म्हणून उद्घाटन केले. पण प्रत्यक्षात त्या उपलब्ध होत नसल्याची माहिती मनसेचे महेश कदम यांनी दिली
महापालिकेच्या आवारात ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या पीएमटी बसचे रूपांतर रुग्णवाहिकामध्ये करण्यात आले आहे. अशा अनेक रुग्णवाहिका मागच्या अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. मात्र तरीही कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला सहा तास वाट बघायला लागते, हिच महापालिकेच्या दृष्टीने शोकांतिका आहे. एकीकडे हजारो बेडचे नवीन रुग्णालय उभारले जातात, मात्र या रुग्णालयांमध्ये कर्मचारी, डॉक्टरांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे.