ठाणे -महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही किंवा ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याचे प्रमाणपत्र दाखवणे आता बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्या कर्मचारी व अधिकाऱ्याला मासिक वेतन दिले जाणार नाही, असा निर्णय ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आहे.
ठाणे महापौर नरेश म्हस्के माहिती देताना रुग्ण आणि नातेवाईकांना प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय केसपेपर नाही -
यावेळी ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील लस घेतल्याचे प्रमाणात दाखवल्याशिवाय केस पेपर दिले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्याच्या विचारात आहोत असे भाकीतही महापौरांनी केले आहे.
5 लाख नागरिकांनी केले नाही अद्याप लसीकरण -
ठाणे पालिकेच्या हद्दीत नागरिकांनी सुरुवातीला कोरोना लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र आता कोरोनाची लाट ओसरताच नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. अजूनपर्यंत जवळपास 5 लाख 35 हजार ठाणेकरांनी लस न घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर ठाणे पालिकेने वेतन थांबण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
'लसीकरण दारोदारी' महापालिकेची विशेष मोहिम -
सामान्य नागरिकांच्या लसिकरणासाठी पालिकेने येत्या 9 तारखेपासून 'लसीकरण दारोदारी' या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाच्या घरी जाऊन लस दिली जाणार आहे. यामध्ये पालिकेचे 167 पथक या तैनात करण्यात येणार आहेत. या पथकात सर्व आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर तसेच शिक्षक यांना देखील समाविष्ट करून घेतले जाणार आहे. खासगी आस्थापन बाबतही कठोर निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -मुंबईत वाढतेय आरएसव्ही व्हायरसची भीती, लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे आयुक्त काकाणी यांचे आवाहन