ठाणे -"महागाईने उच्चांक गाठलाय, आता महागाई गरीबांचा जीव घेणार; आणि आता श्री राम, जय राम, जय जय राम म्हणायची वेळ आली आहे", असा संदेश देणारे होर्डींग्ज राष्ट्रवादी काँग्रेसने सबंध शहरभर लावले आहेत. दरम्यान, सध्या राजकारणासाठी प्रभू रामाचा वापर करून "राम"का"रण" पेटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रभू रामाच्या नावाखाली धार्मिक उच्छाद मांडून जनतेचे महागाईवरील लक्ष विचलित केले जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या सभा घेणाऱ्यांनी आपल्या सभेतून एकदा तरी याबाबत जाब विचारण्याचे धैर्य दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.
आनंद परांजपे - ठाणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसने शहरभर इंधनाचे तुलनात्मक दर दर्शवणारे फलक लावले आहेत. सन 2014 मध्ये पेट्रोलचे दर 71 रूपये होते. तर आता ते 121 रूपयांच्या घरात गेले आहेत. सन 2014 मध्ये डिझेल 56 रूपये होते. आता ते दर 105 रूपये झाले आहेत. सन 2014 मध्ये 410 रूपयात मिळत असलेला गॅस सिलिंडर आता 950 रूपये झाला आहे. त्यामुळेच आता जनतेला श्री राम, जय राम, जय जय राम म्हणण्याची वेळ महागाईने आणली आहे, अशा आशयाचे फलक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि शहर कार्यकारिणीने शहरभर लावले आहेत. विशेष म्हणजे, भाजप कार्यालयाच्या समोरच असा होर्डींग्ज लावून भाजपच्या येथील नेत्यांनी पंतप्रधान मोदींपर्यंत जनतेचा आक्रोश पोहचवावा, असे आवाहनही राष्ट्रवादीने केले आहे.
दरम्यान, 'महागाईने गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. पण, त्याची फिकीर कोणालाही नाही. इंधन दरवाढीविरोधात आंदोलने करून सत्तेवर आलेल्या भाजपला आता आपल्या सत्ता कार्यकाळात हे वाढलेले दर दिसत नाहीत, यासारखे दुर्दैव कोणते असणार. एकीकडे मोदी या महागाईबाबत कोणतेही भाष्य करीत नसतानाच राज्यात मोठ्या सभा घेणारे काही नेते धार्मिक उन्माद माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महागाईवरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न -
राज तिलक की करो तयारी, आ रहा है भगवाधारी, असे म्हणत महागाईवर जनतेचे लक्ष जाऊ नये, यासाठी धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, अशा लोकांना आपले सांगणे आहे की, भगवा हा रंग सत्य, त्याग, शौर्य, ज्ञान एकतेचा आणि सहिष्णुतेचे प्रतिक आहे. त्यास धर्माच्या चौकटीत अडकवू नये. हा देश हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शिख, बौद्ध , पारसी या सर्वांचाच आहे. एका भगव्यामुळे किंवा एकट्या हिरव्यामुळे तिरंगा तयार होत नाही. या दोन रंगांसोबत पांढरा रंग आणि निळ्या रंगाचे अशोकचक्र एकत्र येऊनच देशाची अस्मिता, मानसन्मान असलेला राष्ट्रध्वज तिरंगा तयार होत आहे. आज गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू-मुस्लीम धर्मियांसह ख्रिश्चन, जैन बौद्ध, शिख या सर्वच संप्रदायांना महागाईच्या आक्राळविक्राळ तोंडातून बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र, जनतेचा हा आक्रोश लहान असल्याने मोदी सरकारला तो दिसावा, यासाठी मोठे फलक लावले, आहेत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले.