ठाणे - 'सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी घरात बसून स्वयंपाक करावा; आरक्षण द्या नाहीतर मसणात जा', अशी टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Statement On Supriya Sule ) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने पुतळा जाळला. बुधवारी राष्ट्रवादीच्या ओबीसी ( Supriya Sule In NCP OBC conference ) परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना, 'खासदार आहात ना, समजत नसेल तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा मसणात जा; पण, आरक्षण द्या' , अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले.
ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचविता येत नाही, संन्यास घेण्याची घोषणा करून पराभवानंतरही तोंडवर करून काहीही बरळत आहेत, त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला कुंकू, नथीचे चित्र काढून त्यास जोडे मारण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. काही आंदोलकांनी चंद्रकांत पाटील यांचा पुतळाही जाळला.
चंद्रकांत पाटील यांची मनुवादी विचारसरणी -हा महाराष्ट्र जिजाऊ, अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले यांचा आहे. त्यांचा वारसा अतिशय सक्षमपणे सुप्रिया सुळे चालवत आहेत. याची जाण तमाम महाराष्ट्राला आहे. तरीही, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला देऊन देशातील तमाम मायभगिनींचा अवमान केला आहे. 21 व्या शतकात देशातील महिलांनी चूल मूल ही संकल्पनाच मोडीत काढून सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्या महिलांना पुन्हा चूलमूल या संकल्पनेत अडकाविण्याची चंद्रकांत पाटील यांची मनुवादी विचारसरणी पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आली आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मनोरुगणालयात बेड बुक - 'शूद्र, पशू और नारी; सब है ताडण के अधिकारी' अशी मानसिकता भाजपची आहे. त्याच मानसिकतेतून चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबतीत हे विधान केले आहे. यातून चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यांना ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवा. त्यांच्यासाठी आम्ही एक बेड आरक्षित करीत आहोत. तसेच ते ठाण्यात आल्यावर त्यांना साडीही देऊ, अशी टीकाही परांजपे यांनी केली.
हेही वाचा -Chandrakant Patil : सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा घुमजाव; म्हणाले...