नवी मुंबई - कोरोनाचा उद्रेक होत असताना बनावट चाचणी अहवाल तयार करून कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचे कांड समोर आले आहे. रबाळे एमआयडीसीमधील १३३ कामगारांचे कोरोना आरटीपीसीआर टेस्टचे बनावट अहवाल दोन पॅथॉलॉजी लॅबकडून देण्यात आले. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोघांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रविण इंडस्ट्रीज व टि. टि.सी. इंडस्ट्रीज या कंपनीतील १३३ कामगारांची कोरोना आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट देण्याकरीता ठाणे येथील मिडटाउन डायग्नोस्टीक लॅबोरेटरीचे मालक देवीदास घुले यांना सांगितले होते. त्याप्रमाणे देवीदास घुले यांनी त्यांचे सहकारी कल्याण येथील परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजीचे मालक महमद वसीम असलम शेख यांच्यासोबत संबंधित कंपनीमध्ये ८ एप्रिलला कॅम्पचे आयोजन केले. त्यानंतर प्रवीण इंडिस्ट्रीजच्या १३३ कामगारांचे रिपोर्ट निगेटिव्ह दाखवण्यात आले.
नवीन मुंबईत बोगस आरटीपीसीआर टेस्ट
हेही वाचा-धक्कादायक! नाशकात चक्कर येऊन एका दिवसात 9 जणांचा मृत्यू
थायरोकेअर लॅबच्या बनावट लेटरहेडचा वापर
कॅम्पमध्ये कंपनीतील १३३ कामगारांचे थायरोकेअर लॅब तुर्भे यांनी १९आरटीपीसीआर टेस्टसाठी नागरिकांच्या स्वॅब गोळा करून तपासणीसाठी त्यांचेकडे पाठविण्याचे अधिकार परफेक्ट हेल्थ पॅथोलॉजी चे मालक महमद वसीम असलम शेख यांना दिले होते. त्यानुसार थायरोकेअर लॅब येथे टेस्टींग करीता पाठविणे आवश्यक असताना परफेक्ट हेल्थ पॅथोलॉजीचे मालक महमद वसीम असलम शेख यांनी तसे करता परस्पर थायरोकेअर लॅबच्या लेटरहेडचा वापर केला. त्याच्यावर १३३ कामगारांचे कोरोना टेस्टचे बनावट अहवाल प्रत्येकास स्वतंत्र बारकोड नुसार न देता ते एकाच बारकोडवर महमद वसीम असलम शेख यांनी दिले. कामगारांच्या आरोग्याची हेळसांड करून त्यांचे आरोग्य धोक्यात आणले. तसेच प्रविण इंडस्ट्रिल कंपनीतील कामगारांच्या आरटीपीसीआर टेस्टकरिता ८६,४५० रुपये घेतले. त्यामधून थायरो केअर लॅब कंपनीची फसवणूक करून बदनामी केली.
हेही वाचा-देशात तब्बल २ लाख १७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १,१८५ मृत्यू
महम्मद वसीम शेख, देविदास घुले या दोघांना अटक
नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे म्हणाले की, याप्रकरणी देविदास महादू पुले (४४)व महमद वसीम असलम शेख (२१) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कॉम्प्युटर साहित्य, लॅबरेटरी साहित्य अशी ७२ हजार रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे.
शुक्रवारी राज्यात तब्बल ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद-
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४५ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.