ठाणे -सैराट या मराठी चित्रपटाची पुनरावृत्ती अंबरनाथ शहरात घडल्याचे समोर आले आहे. एका तरुणाने प्रेमविवाह केल्याच्या वादातून त्या तरुणाची दिवसाढवळ्या घरासमोरच निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात घडली असून, या हत्येचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचानामा करत ५ ते ७ हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच २ आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. विजय नवलगिरे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो रिक्षाचालक होता.
हेही वाचा -देशातच नाही तर जगात पंतप्रधान मोदींची थू थू होतेय - नाना पटोले
११ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह ..
मृत विजय याने ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातले काही तरुण विजयला आमच्या भागातल्या मुलीशी प्रेमविवाह का केला? असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होते. त्यातूनच आज दुपारी साडे तीनच्या सुमारास विजयच्या घरी ५ ते ७ तरुण आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला घराबाहेर आणत त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित
विजयची हत्या होत असताना त्याची पत्नी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, आरोपीने त्याच्या पत्नीला बाजूला सारत त्याची हत्या केली. त्यानंतर त्याला इमारतीच्या प्रवेशदारावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फरफटत नेले. हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात वाटसरूने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला. हत्येच्या घटनेनंतर काही मिनिटात घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांचे पथक दाखल झाले आणि पळून जात असलेल्या दोन आरोपींचा पाठलाग करत ताब्यात घेतले, तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
हेही वाचा -स्मशनात जागा नाही! ख्रीस्ती धर्मीय रुग्णांच्या मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार