ठाणे - खानावळीसाठी घरी येणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचे आठ वर्षाच्या मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. मात्र अनैतिक संबंधामध्ये ८ वर्षीय चिमुरडा अडसर ठरत असल्याने त्या चिमुरड्याचे आरोपीने अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कारवली गावातील एका इमारतीच्या बंद खोलीत घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. जितेंद्र मधेशिया (वय २१) असे अटक आरोपीचे नाव आहे.
चिमुरड्याच्या अपहरणाची तक्रार केली होती दाखल -
भिवंडी तालुक्यातील कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाचा ८ वर्षाचा मुलगा हा गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने परिसरात शोधूनही त्याचा शोध न लागल्याने अखेर भोईवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला असता शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेत मृतदेह तो राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक बंद खोलीत आढळून आला. भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.