नवी मुंबई - दिवसागणिक महिला अत्याचारात वाढ होत असतानाच नवी मुंबई परिसरातील उलव्यात एका मध्यमवयीन महिलेची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेसंदर्भात नवी मुंबईतील एन. आय. आर. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवा परिसरात राहणारे बाळकृष्ण भगत (वय, ५५) पत्नी प्रभावती भगत (वय, ५०) यांच्यासह पनवेलमधील नातेवाईकांच्या घरी जात होते. उलवे सेक्टर १९ मध्ये बाळकृष्ण यांनी त्यांची स्विफ्ट कंपनीची गाडी उभी केली व पत्नीला गाडीत बसवून ते स्वतः पैसे काढण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ए. टी. एम. मधे गेले. यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने प्रभावती यांना लुटण्याच्या उद्देशाने गाडी सुरू केली आणि त्यांच्यासह गाडी चोरून नेली व वहाळ परिसरात नेऊन प्रभावती यांच्या अंगावरील दागिने लुटले आणि दागिने लुटत असतानाच त्यांना गोळी झाडून ठार केले. यानंतर गाडी तिथेच सोडून संबंधित आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा -प्रेम न करण्याची शपथ घेतलेल्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचा 'प्रेमविवाह'
बाळकृष्ण भगत पैसे काढून परत आले असता पत्नी आणि गाडी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर घाबरलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मुलाला फोन केला व या घटनेची माहिती दिली. आई हरवली आहे ही माहिती मिळताच भगत यांचा मुलगा तत्काळ घटनास्थळी पोहोचला आणि आसपासच्या परिसरात आपल्या आईचा शोध सुरू केला.
दरम्यान, वहाळ परिसरातील सेक्टर २३ मध्ये त्यांच्या मुलाच्या निदर्शनास गाडी आली. या गाडीमध्येच प्रभावती भगत रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या. त्यांच्या छातीत गोळी लागल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. यानंतर जखमी प्रभावती यांना जवळच असणाऱ्या अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र छातीला गोळी लागल्याने प्रभावती यांना वाचविण्यास अपयश आले व डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा -पंतप्रधान मोदी घेणार सोशल संन्यास.. रविवारनंतर फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अन् यूट्यूबला रामराम..
प्रभावती भगत यांच्या अंगावरील दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबधित
परिसरातील सीसीटीव्ही व्हिडिओ पाहण्याचे काम सुरू असून अज्ञात आरोपी विरुद्ध एन. आर. आय. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.