महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात पुराने स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना होणार अन्नधान्याचा वाटप; महापालिकेचा निर्णय - ५ किलो गहू

ठाणे शहरात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतरित करण्यात आले. त्यांचा अन्नधान्याचा प्रश्न मिटावा याकरिता महापालिकेकडून स्थलांतरित कुटुंबांना अन्नधान्याची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 6, 2019, 11:00 AM IST

ठाणे- बारवी धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी भरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्या कुटुंबांना अन्न-धान्याची पाकिटे देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विस्थापितांना तातडीने मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील साफसफाई, वैद्यकिय सुविधा आणि रस्ते दुरूस्ती आदि कामेही युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरात पाणी भरले, त्या सर्व ठिकाणच्या नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, डॅाक्सीसायक्लीन गोळ्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देणे, पाण्याचा निचरा झाल्यानंतर तेथील चिखल, कचरा तत्काळ उचलणे तसेच या सर्व ठिकाणी फवारणी करणे आदी कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.

दरम्यान, स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांना ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, १ किलो साखर, २ किलो बटाटे, १ लिटर खाद्यतेल आणि १ ब्लँकेट पुरविण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयुक्त जयस्वाल यांनी स्थानिक आमदार, नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून ही मदत देण्यात यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details