ठाणे -भिवंडी तालुक्यातील ३३ गावांमध्ये वनखात्याच्या जमिनींवरील आदिवासी कुटुंबीयांच्या तब्बल तीन हजार घरांना वनविभागाने घरे मोकळी करून जागा वनखात्याच्या ताब्यात द्यावी अन्यथा कारवाई केली जाईल अशी अन्यायकारक नोटीस बजाविल्याने या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी वनक्षेत्रपाल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भिवंडी तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते.
मोर्चेकरांच्या विविध मागण्यांसह वन अधिकाऱ्यांना इशारा
आदिवासी कुटुंबीयांना दिलेली नोटीस तत्काळ मागे घ्या, आदिवासी कुटुंबीयांना बेघर करून त्यांना भयभीत करणाऱ्या वन अधिकाऱ्यां विरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करा, आदिवासींच्या रहिवासी असल्याबाबतचे पुरावे वनविभागाने गोळा करावेत, अशा मागण्या घेऊन बस स्थानकातून सुरू झालेल्या या मोर्चाचे वनपरीक्षेत्र कार्यालयात सभेत रूपांतर झाले. त्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, सुनील लोणे, प्रमोद पवार, दशरथ भालके, संगीत भोमटे, जया पारधी, आशा भोईर, सागर देसक, मोतीराम नामखुडा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सभेत अनेकांनी मार्गदर्शन करताना वनविभागाच्या अरेरावी कार्यपद्धतीचा पाढा वाचून यापुढे ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.