ठाणे -बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह रजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. सुशांतसिंह राजपूतसारख्या कलाकारांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे का? यावर मनसेची चित्रपट सेना अभ्यास करत आहे. असा प्रकार खरच होत असेल तर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात येईल किंवा त्यांचे चित्रपटच तयार होऊ देणार नाही, असा इशारा मनसे नेते व दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी दिला. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे प्रकार होत नसल्याबद्दल पानसे यांनी समाधान व्यक्त केले.
उत्कृष्ट कलाकार असलेल्या सुशांतसिंह रजपूतने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. काही लोकांची यासंदर्भात चौकशी देखील होत आहे. मात्र, चौकशी केली तरी एकदा गेलेला माणूस परत येणार नाही. त्यामुळे चांगल्या कलाकारांवर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असे आवाहन पानसे यांनी सांगितले.