ठाणे -पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ला झाल्यानंतर मनसेकडून आता 'फेरीवाला हटाओ' मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान मनसेने सर्व पालिका आवारातील सर्व हातगाड्या पळवून लावल्या आहेत. हे सर्व फेरीवाले परप्रांतीय असून यांना आळा घालण्यासाठी हे आंदोलन पुन्हा हाती घेण्यात आले आहेत. ठाण्यात कुठेही फेरीवाले दिसले की त्यांना पळवून लावू, इथे फेरीवाल्याचा सुळसुळाट असून यावर काही अधिकाऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असल्याचा आरोप मनसेचे महेश कदम यांनी केला आहे.
पालिकेच्या मुख्यालयासमोर फेरीवाले -
ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच फेरीवाले आपला व्यवसाय बिनदिक्कत पणे वर्षानुवर्षे करत आहेत. ना फेरीवाला झोन असो, वा स्टेशन परिसर ठाण्यातील सर्वच रस्त्यांवर फेरीवाल्यांचे बस्तान बसलेले पाहायला मिळत आहे. पालिकेच्या कुचकामी धोरणाचा फायदा फेरीवाले घेत आहेत. आतापर्यंत शेकडो गुन्हे दाखल होऊनही कायमस्वरूपी तोडगा न काढल्याने आजचा प्रकार पाहायला मिळाला असल्याचेही महेश कदम यांनी म्हटले. तसेच या फेरीवांल्याना कायम स्वरूपी हटवण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचेही ते म्हणाले.