महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray Thane Sabha : ठरलं.. ठाण्यात १२ एप्रिलला 'राज'गर्जना.. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार..

ठाण्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेतील अडथळा दूर झाला ( Raj Thackeray Thane Sabha ) आहे. मात्र, ९ एप्रिलऐवजी १२ एप्रिलला राज ठाकरे यांची तोफ ठाण्यात धडाडणार आहे. या सभेत राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार? याबाबत मनसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.

ठरलं.. ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार.. १२ एप्रिलला 'राज'गर्जना
ठरलं.. ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार.. १२ एप्रिलला 'राज'गर्जना

By

Published : Apr 7, 2022, 10:09 PM IST

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिल रोजीच्या ठाण्यातील जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता ही उत्तर सभा १२ एप्रिल रोजी होणार ( Raj Thackeray Thane Sabha ) आहे. अशी माहिती मनसे नेत्यांनी गुरुवारी सायंकाळी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनसे नेत्यांनी मविआ सरकारकडून केल्या जाणाऱ्या अडवणुकीचा पाढा वाचला. ह्यांनी घातलेला गोंधळ चालतो आणि मनसेच्या सभेला परवानगी द्यायची नाही. ही कसली लोकशाही असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी करून येत्या १२ एप्रिलला या सर्वाची उत्तरक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील, असा गर्भित इशारा देण्यात आला. दरम्यान, तब्बल १० तास खलबते केल्यानंतर पोलिसांनी सभेच्या ठिकाणाबाबतचे मौन सोडून अखेर १२ एप्रिल रोजी गडकरी रंगायतन नजीक डॉ. मुस रस्त्यावरच सभेला परवानगी दिल्याचे समजपत्र मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सुपूर्द केले.

प्रदीर्घ काळानंतर ठाण्यात सभा : मराठीच्या मुद्यासोबतच ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचे आणि मदरशांवर धाडी टाकण्याची भूमिका मांडत महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. याला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आव्हाड यांच्या मुस्लीम प्रेमावर टीका केली होती. महाआघाडीतील इतर नेत्यांसह वंचित आघाडीकडुनही राज यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. या सर्व आरोप - प्रत्यारोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची ९ एप्रिल रोजी ठाण्यातील मूस रोडवर उत्तर सभा घेण्याचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळाने ठाण्यात ही पहिलीच जाहिर सभा होत असल्याने मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह हजारो मनसैनिक सभा यशस्वी करण्यासाठी झटत होते. मात्र, पोलिसानी ऐन नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सभेसाठी गर्दी उसळून वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण होईल, असे कारण देत सभेला परवानगी नाकारली होती.

ठरलं.. ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार.. १२ एप्रिलला 'राज'गर्जना

अन् पोलिसांनी नमते घेतले : मनसेच्या या उत्तर सभेसाठी सुरुवातीला गडकरी रंगायतन समोरील डॉ.मुस रोडवरील रस्ता निश्चित करून मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी बुधवारी पाहणीही केली होती. मात्र, पोलिसांनी या रस्त्यावर सभेसाठी परवानगी नाकारल्याने गुरुवारी सकाळी बाळा नांदगावकर यांनीही ठाण्यात भेट देऊन रस्त्यावर टेबल टाकुन राज ठाकरे यांची सभा घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, गुरुवारी दिवसभर मनसे नेत्यांनी काथ्याकूट केल्यानंतर पोलिसांनी नमते घेत ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी गडकरी रंगायतन येथील डॉ.मूस रस्त्यावरील सभेला परवानगी दिली आहे.


राजकीय दबाव आणून परवानगी केली रद्द : आज दुपारी आम्हाला गजानन महाराज चौक येथे राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. सभेचे मोजमाप जेव्हा सुरू करण्यात आलं तेव्हा पोलिसांनी थांबा अशी भूमिका घेतली. राजकीय दबाव आल्यामुळेच ही परवानगी रद्द करण्यात आली. याबाबत राज ठाकरे सभेमध्ये खुलासा करतील, अशी माहितीही यावेळी अविनाश जाधव यांनी दिली.


वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभेत येणार :पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्याठिकाणी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतीत माध्यमांमध्ये अनेक बातम्या होत्या. याबाबत खुलासा करताना अविनाश जाधव यांनी वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या 12 तारखेच्या सभेला येणार असल्याचे सांगितले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details