ठाणे -सांगितलेल्या मुदतीत पत्रीपूलाचे काम पूर्ण न झाल्याबद्दल रविवारी कल्याण शहर मनसेतर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करून सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. काळे फुगे, जोडीला फटाके आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजीमध्ये मनसेने अदृश्य पत्रीपुलाचे उद्घाटन केलेले पहायला मिळाले.
कल्याणच्या अदृश्य पत्रीपुलाचे मनसेकडून उद्घाटन, शिवसेनेच्या नावाने शिमगा
सांगितलेल्या मुदतीत पत्रीपूलाचे काम पूर्ण न झाल्याबद्दल रविवारी कल्याण शहर मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत अदृश्य पत्रीपूलाचे उद्घाटन करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फेब्रुवारी 2020 मध्ये पत्रीपुल पूर्ण होण्याचे आश्वासन शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. मात्र, त्याची मुदत उलटूनही अद्याप पत्रीपुल सुरू झाला नसल्याने कल्याण शहर मनसेतर्फे हे अनोखे उपरोधिक आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, शहराध्यक्षा शीतल विखणकर यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या. पत्रीपुलाच्या गर्डरला जागोजागी निषेधाचे काळे फुगे, आश्वासन पूर्ती न झाल्याबाबतचे फलक जागोजागी दिसत होते. मनसेने श्रीफळ वाढवून या अदृश्य पत्रीपुलाचे उद्घाटन केले.
हा अदृश्य पूल पाहता यावा यासाठी विशेष 3 डी चष्मेही आंदोलनकर्त्यांनी घालले होते. पालकमंत्री, खासदार, आमदार आणि महापालिकेमध्ये सत्ता असूनही शिवसेना एवढा महत्वाचा पूल बनवण्यात अपयशी ठरल्याची टिका मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी यावेळी बोलताना केली. मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनोद केणे आणि विभागाध्यक्ष कपिल पवार यांच्या संकल्पनेतून हे अनोखे निषेधात्मक आंदोलन करण्यात आले.