ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांची मंगळवारी (दि. 12 एप्रिल) ठाण्यात सभा होत आहे. मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचे नव्हते म्हणून मी सभा घेतली. एक समान नागरी कायदा आणावा आणि लोकसंख्या वाढीवर एक कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते ठाण्यातील 'उत्तर' सभेत बोलत होते.
राज ठाकरे यांनी दिला गृह विभागाला अलटीमेटम -3 मे पर्यंत भोंगे उतरावा नाहीतर हनुमान चालीसा सुरूच राहील. 3 तारखेला ईद आहे माझे राज्य सरकारला आवाहन आहे. महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडवायचे नाही सर्व मशिदी वरील भोंगे खाली घ्या. नंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज ठाकरे यांनी गृह खात्याला डेड लाईन देऊन स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची किव करावी अशी वाटते असेही ते म्हणाले. देशातील प्रामाणिक मुसलमान भरडला जात आहे. 95 टक्के हिंदू वस्तीतून सलीम मामा निवडून येतो. पण यांच्यामुळे तो भरडला जातो.
टीकाकारांचे वाभाडे काढले : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी शिवतीर्थावर केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यासह अनेकांनी टीका केली होती. त्या सर्वाचा समाचार घेण्यासाठी तसेच उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 'उत्तरसभा' मंगळवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील डॉ.मूस रोडवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्यावरून टीकेचे आसुड ओढत टीकाकारांचे वाभाडे काढले.
शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्याबाबत संशय : राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तरसभेला पावणे आठ वाजता सुरुवात केली. यावेळी जनतेला संबोधित करताना आता इतकी काही आग लावणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी अग्निशमन दलाची गाडी पाहून केले. दरम्यान, माझा ताफा अडवणार आहात हे मला पोलिसांकडून कळालं. हे इंटिलीजन्स एजन्सीला कळालं. मात्र, शरद पवार यांच्या घरी हल्ला होणार हे नाही कळालं, अशा शब्दात पोलिसांवर एकप्रकारे राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला.
माझा ट्रॅक बरोबरच : दरम्यान मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला असा माझ्यावर आरोप केला. पण मी ट्रॅक नाही बदलला. माझा ट्रॅक बरोबर असून ईडीची नोटीस आल्यावर मी ईडी कार्यालयात गेलो. मी कोणतं ही पाप केलं नाही. त्यामुळे नोटिसा कोणत्याही येवूद्या मी त्याला भीक नाही घालत नसल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद मोदीच्या काही बाबी मला नाही पटल्या म्हणून बोलत होतो. मात्र त्यांनी 370 कलम हटवलं तेव्हा मीच पहिलं अभिनंदन केले होते, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. भविष्यात मोदींनी काही चुकीच केलं तर मी परत बोलेल, असे देखील राज ठाकरे यांनी सांगितलं.