ठाणे- गेल्या 4 वर्षांत खड्डे भरण्यासाठी जवळपास ४५६ कोटी रूपये खर्च करूनही डोंबिवलीतील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही. सध्या रस्त्याची स्थिती गेल्या ६० वर्षांपूर्वीच्या रस्त्यांपेक्षाही दयनीय असल्याची खंत देशाचे ख्यातनाम गायक हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील कार्यक्रमात व्यक्त केली. यावर मनसेने सत्ताधाऱ्यांसह डोंबिवलीचे आमदार राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ४५६ कोटींच्या रस्त्यांना तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच त्यातील काही कामांची भुमीपूजनही झालीत. निवडणुकीच्या तोंडावर भूमीपूजनाचा घाट घालून डोंबिवलीकरांची चक्क फसवणूक केल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच राज्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवली.
निवडणुकाच्या तोंडावर रस्त्यांच्या भूमिपूजनाचा घाट; मनसेचा राज्यमंत्री चव्हाणांवर आरोप - मंदार हळबे
राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भुमीपूजनाचा घाट घालून डोंबिवलीकरांची चक्क फसवणूक केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
एमएमआरडीएचे ४५६ कोटी व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे १४.८० कोटी कामांच्या भुमीपूजनाचा राज्यमंत्री चव्हाण यांनी सपाटा लावला आहे. या कामांना फक्त तत्वतः मंजूरी मिळाली आहे. सदर रस्त्यांचा डीपीआर तयार करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचे एमएमआरडीएकडून सुचवण्यात आले आहे. महापालिकेच्या १४.८० कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. डीपीआर तयार करणे, निविदा काढणे या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात व्हायला किमान ६ - ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच निवडणूकीच्या तोंडावर ४५६ कोटींच्या रस्त्यांची घोषणा व त्यातील काही कामांचे भूमिपूजन करणे म्हणजे नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. रविवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत मनसेने हा आरोप केला आहे. यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, विरोधी पक्ष नेता प्रकाश भोईर, गटनेता मंदार हळबे, शहराध्यक्षा मंदा पाटील, विभागाध्यक्षा मनाली पेडणेकर उपस्थित होते.
पत्रकारपरिषदेत गटनेते मंदार हळबे यांनी काही कागदोपत्री पुरावे सादर केले. राज्यमंत्र्यांना जर बुद्धिजीवी ब्राह्मण समाजाचा कळवळा असता तर त्यांनी २०१४ साली महानगरपालिकेने डोंबिवलीच्या गोपाळनगर येथील जागेत वेदशाळा पाच वर्षात बांधली असती. मात्र आयुक्त गोविंद बोडके यांनी वृद्धांच्या संगोपनासाठी ११ महिने देऊ केलेल्या जागेत बेकायदेशीरपणे वेदशाळेचे उद्घाटन करण्याचा घाट घातला. त्यामुळे डोंबिवलीतील ब्राम्हण समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. वेदपाठशाळेला पालिकेची मंजुरी नाही. जागा गिळंकृत करण्याचा हा डाव आहे. त्यातच आयुक्त गोविंद बोडके हे यांच्या हातातले खेळणे असल्याने त्यांनी या शाळेला मंजुरी दिली आहे. वेदपाठशाळेला मनसेचा विरोध नाही. मात्र धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव डोंबिवलीकरांनी ओळखावा, फसव्या व खोटारड्या राज्यमंत्र्यांपासून वेळीच सावध रहावे, असेही आवाहन मनसे नेत्यांनी यावेळी केले.