ठाणे - धरणाचा तालुका असूनही शहापूर तालुक्याची तहान भागत नसल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाटी मी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी लढवत आहे, असे राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत सामील झालेले आमदार पांडुरंग बरोरा यांनी स्पष्टीकरण दिले. शहापूर विधानसभा मतदासंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना बरोरा यंनी पहिल्यांदाच पक्ष बदलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा -मुंबईचे गोरखपूर होते आहे - जितेंद्र आव्हाड
ठाणे जिल्ह्यातील धरणाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीची साथ सोडून दीड महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू नये, म्हणून सेनेतील एक गट सक्रिय झाला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे बरोरा यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून प्रतिस्पर्धी पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे पुन्हा बरोरा विरुद्ध दरोडा असा सामना रंगणार आहे.
हेही वाचा -मनसेकडून ३६ किलोमीटर पायी फिरून होणार प्रचार; अविनाश जाधवांच्या 'इंजिन'ची मुसंडी
विशेष म्हणजे शहापूर तालुक्यातील सर्वच धरणातून मुंबईसह ठाणे जिल्ह्याची तहान भागवले जाते. मात्र, तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा तालुक्यातील शेकडो गाव-पाड्यांना बसतात. जिल्हा परिषद व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत दरवर्षी पाणीटंचाईवर आराखडा तयार करून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, तरीही शहापूर तालुक्यातील नागरिकांची घागर रिकामीच असते.
2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीची घडी विस्कटल्याने तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे दौलत दरोडा यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा मोदी लाटेतही विधानसभेवर निवडून गेले होते. भाजपचे अशोक इरनक यांनी 18 हजार मते मिळवली होती, निवडणुकीत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागणे हे सर्व स्वभाविक आहे. तरीसुद्धा शहापूर तालुक्यात मात्र इतर उमेदवारांपेक्षा राष्ट्रवादीच्या तिकिटावरुन लढणारे सेनेचे माजी आमदार दौलत दरोडा व शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरणारे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे चाळीस वर्षानंतरही दरोडा विरुद्ध बरोरा या नावांची प्रतिस्पर्धी जोडी मतदारांसमोर अस्तित्वाची लढाई लढणार आहेत. त्यातच पक्षाचा झेंडा बदलून बरोरा आणि दरोडा हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आमने-सामने उभे ठाकले आहेत. शहापूर विधानसभेचा चाळीस वर्षाचा काळ पाहिला तर महादू बरोरा चार वेळा, दौलत दरोडा तीनवेळा, आणि विद्यमान पांडुरंग बरोरा यांनी विधानसभेचे साडेचार वर्ष आमदार म्हणून सदस्य पद भूषवले आहे.