मीरा-भाईंदर(ठाणे) : मिरा भाईंदरमधील एका महिला आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यासोबतच अग्निशमन दलाच्याही एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. महिला आमदाराची प्रकृती स्थिर असल्याने त्यांचे घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने पी. बी. जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा...'पतंजलीच्या कोरोनील किटवर आता निर्बंध नाहीत, देशभरात औषध उपलब्ध होईल'
दोन दिवसांपूर्वी या महिला आमदाराला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांनी स्वतःला घरीच अलगीकरण करून घेतले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील घरीच अलगीकरण होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २८ जून रोजी अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांना मिरारोड सेक्टर ७ जवळील पी. बी. जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. आतापर्यंत शहरात तब्बल ३,३२६ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर १५३ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.