ठाणे -महिला बाल विकास विभागाचा निधी योग्य पद्दतीने आणि पुरेसा खर्च होत नसल्याचे लक्षात आल्याने यापुढे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला बाल विकास विभागाचा निधी कसा खर्च केला ठेवण्यासाठी ट्रेकिंग सिस्टीमचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच जबाबदारी निश्चित करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ठाण्यात सांगितले.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांशी संवाद साधण्यासाठी ठाकूर ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी दिवसभरात अनाथ मुलांसाठी निर्माण करण्यात आलेला टास्क फोर्स, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील जी अनाथ बालके उपस्थित होती त्यांच्याशी आणि त्यांच्या एकल पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
राज्यात कोरोना काळात आतापर्यंत २८४ बालके अनाथ झाली असून यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४२ बालकांचा समावेश आहे. अनाथ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात येणार असून ते पैसे त्यांना २१ वर्षानंतर मिळणार आहेत, असे असले तरी बालसंगोपनाचे पैसे वाढवण्याचा सरकारचा विचार असून तो विषय येणाऱ्या कॅबिनेट समोर येणार आहे. प्रत्येक बालकाच्या समस्या वेगळ्या असल्याने सर्वंकष विचार करून त्यांना मदत केली जाणार आहे.