ठाणे -राज ठाकरे यांनी सकाळी लवकर उठून मुंब्र्यातील मदरशात यावे. मदरशात दाढी करण्याचा एक वस्तराही सापडला तर राजकारण सोडेन, असे आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणाचा समाचार घेताना त्यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी मिळते म्हणून राज ठाकरे ( Raj Thackeray ) पवारांवर टीका करतात, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.
'त्या' महाराष्ट्राला जाळण्याचा प्रयत्न करू नका- मदरशावरील व मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, बोलून जनतेचे टाळ्या मिळवणे फार सोपे असते. पण, आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील. महाराष्ट्रात या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार एकदा तरी करायला हवा होता. ज्या घरात आपला जन्म झाला त्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी झाली आहे. आज त्याच महाराष्ट्राला जाळण्याचा प्रयत्न करू नका, असेही आव्हाड म्हणाले.