मुंबई - दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करावी, असे निर्देश मंत्री शिंदे यांनी दिले.
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-१९ चा नवा घातक व्हेरियंट सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त व मुख्याधिकारी ( Meeting of BMC officers with Minister Eknath Shinde ) यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा-Rampath Yatra special train पुणे रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला रामपथ स्पेशल रेल्वे रवाना
आरोग्य यंत्रणांची तपासणी करा - एकनाथ शिंदे
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात कमी होत आहे. परंतु, प्रशाकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणा निर्धास्त झालेल्या दिसतात. सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत महत्त्वाचे निर्देश दिले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की दक्षिण आफ्रिकेतील घातक विषाणूंमुळे आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवावे. तसेच सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, विद्युत ऑडिट तातडीने करुन घ्या, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत. त्या रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहे. सामान्य नागरिकांकडून मास्क वापरण्यात टाळाटाळ केली जाते. अनेक ठिकाणी असे दृश्य दिसून येत आहे. अनावश्यक गर्दीदेखील होत असून त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करा. सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी याबाबत जनजागृती करावी. क्लिन अप मार्शलसारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिकास्तरावर मास्कची सक्ती करावी, असे निर्देशही ( Eknath Shinde directions to gov officers in Thane ) नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिले.