ठाणे - शहरातील लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद करण्यासंदर्भातील महापालिकेच्या आदेशाला व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. एकीकडे वाईन शॉपला होम डिलिव्हरीची परवानगी देताना, अन्य वस्तूंच्या विक्रेत्यांनी गुन्हा केला आहे का, असा सवाल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश श्रीश्रीमाल यांनी केला आहे. तसेच तत्काळ दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
ठाण्यात सर्वच व्यापाऱ्यांनी 5 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पाळला. सम-विषम तारखांना व्यवसायासोबतच सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले. पण ठाणे महापालिकेने अचानक पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याने, व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. मुंबईतील दुकाने उघडी असल्याने ग्राहक तिकडे जात आहेत. आमचा केवळ 10 ते 20% उरलेला व्यवसायही महापालिका करू देत नाही. वाईनशॉप चालकांना परवानगी तर दुसऱ्या वस्तूंचा व्यापार बंदी हा कोणता न्याय, असा सवाल असोसिएशनने केला. या काळात ठाण्यात रुग्ण संख्या वाढत आहे. आणखी लॉकडाऊनमुळे ती कमी होईल का, याचा महापालिकेने विचार करायला हवा, असे मतही कमलेश यांनी व्यक्त केले.