ठाणे -लग्नाला चार वर्षे उलटूनही वंशाला दिवा होत नसल्याने विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात येत होता. त्या रोजच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दर्शना योगेश पाटील ( वय.२३ ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
मूल होत नाही म्हणून सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या - Thane crime news
लग्नाला चार वर्ष उलटूनही वंशाला दिवा होत नसल्याने विवाहितेचा सारच्या मंडळींकडून छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून ठाण्यातील विवाहितेने आत्महत्या केली
मृत दर्शना ( रा.कोनगांव ) हिचे १२ एप्रिल २०१६ मध्ये अलीमघर येथील योगेश पाटील याच्याशी धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. विवाहाच्या दोन वर्षांपर्यंत सुखाने संसार सुरु होता. मात्र, त्यानंतर दर्शनाला मुलबाळ होत नसल्याने सासू ,सासरे यांच्याकडून विचारणा होऊ लागली. त्यानंतर आजपावेतो चार वर्षे उलटली तरी वंशाला दिवा होत नाही. यावरून दर्शना हिला पती योगेश, सासरा रविंद्र व सासू जया यांच्याकडून क्षुल्लक कारणावरून टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. अखेर रोजच्या छळाला कंटाळून दर्शना हिने घरात कोणी नसताना विषारी औषध प्राशन केले. ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असताना पती कामावरून घरी परतल्याने ही घटना त्याच्या निदर्शनास आल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी तात्काळ कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या मृत्यूला पती, सासरा व सासू कारणीभूत असल्याने मृत दर्शना हिची आई रेश्मा रमेश भगत ( ४७ रा.कोनगांव ) यांनी दर्शना हिचे पती योगेश, सासू जया, सासरा रविंद्र या तिघांच्या विरोधात कलम ३०६ ,३४ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी करत आहे.