ठाणे : कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मात्र या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या ट्रॅकमनला रेल्वे रुळावर तडा गेल्याचे दिसताच तात्काळ समोरून येणाऱ्या एक्स्प्रेसला लाल झेंडा दाखवून एक्स्प्रेस थांबवली (vigilance of trackman in Thane). त्यामुळे रेल्वेच्या अपघाताची मोठी दुर्घटना टळली (Major accident of train averted). दरम्यान, रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती मिळतात रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती काम हाती घेतले. पाऊण तासातच रेल्वे रुळांची दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
ट्रॅकमनचे प्रसंगावधान - कल्याण रेल्वे स्थानकानजीक पत्रीपुलाजवळ रेल्वे रुळाला सकाळी ६.३५ वाजता तडा गेल्याचे लक्षात आले. त्यावेळी या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या रेल्वे कर्मचारी हिरा लाल आणि मिथुन कुमार यांना पत्रीपुलजवळ रुळाला तडा गेल्याचे दिसले. दुसरीकडे या रुळावरून समोरून एक्स्प्रेस येत होती. त्याचवेळी मिथुन याने प्रसंगावधान राखत तात्काळ या एक्सप्रेसला लाल झेंडा दाखवला. त्यामुळे ही एक्सप्रेस थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर या दोघांनी या घटनेबाबत रेल्वे कंट्रोल रुमला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरूस्तीचे काम हाती घेतले.