ठाणे - जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरवर आदरांजली वाहिली होती. मात्र, नंतर ते ट्विट अचानक डिलीट करण्यात आले. यावरून भाजपाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर शरसंधान केले आहे. महाविकास आघाडीचा दबाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असल्यास आम्ही या सरकारचा निषेध करतो, असे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने ठाणे भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तृतीयपंथीयांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचा समावेश होता. कर्मचाऱ्यांना पीपीई किट, नाभिक समाज बांधवांना पीपीई किट व महिला रिक्षाचालक व सफाई कामगारांना स्टीमर वाटप आदी कार्यक्रम पार पडला. यावेळी आशिष शेलार यांना अजित पवार यांच्या ट्विटबद्दल विचारले असता ते म्हणाले, पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी आदरांजली वाहून योग्य आणि देशहिताचे काम केले होते. मात्र, ट्विट पुन्हा डिलीट करून दादांनी घोडचूक केली असल्याचे आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात असून, अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडी सरकारचा दबाव असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.