ठाणे -वसई - विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर, ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ( Palghar District President Avinash Jadhav ) यांनी ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा ( MNS's demand to the commissioner ) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई, नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशा प्रकारे गोविंदा पथकांचा विमा उतरवावा.असेही अविनाश जाधव यांनी बोलताना सांगितले.
गोविंदा मंडळांचा सरावही जोमाने सुरु -कोरोनाचे सावट सरल्याने यंदा सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या 'ठाणे' नगरीलाही दहीहंडीचे वेध लागले आहेत. यंदा १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला असुन गोविंदा मंडळांचा सरावही जोमाने सुरु आहे. कोरोना काळात दोन वर्ष गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांवर आलेल्या निर्बंधामुळे मराठी मनावर मरगळ आली होती. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गणेश भक्त आणि गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.