ठाणे- घुसखोर बांगलादेशी महिलांना लॉजवर डांबून ठेवून ठेवले. तसेच त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या लॉज चालकाला मध्यवर्ती पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी लॉज चालकास तब्बल ८ महिन्यांनी पोलिसांनी शोधून जेरबंद केले आहे.
बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या लॉज चालकास अटक
बांगलादेशी महिलांना लॉजवर डांबून ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याऱ्या लॉज मालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी लॉजमालक आठ महिन्यांपासून फरार होता.
रत्नाकर शेट्टी, असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या लॉज चालकाचे नाव आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मध्यवर्ती पोलिसांनी व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांनी गुप्त माहिती मिळवली होती. त्याआधारे उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 येथील शांतीनगर परिसरात असणाऱ्या नित्या रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये छापा टाकण्यात आला. त्यादरम्यान पोलिसांना लॉज मॅनेजर, वेटर आणि लॉज चालक रत्नाकर शेट्टी यांनी तीन बांगलादेशी घुसखोर महिलांना लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवून लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत स्वतःच्या आर्थिक फायदाकरिता त्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्यावेळी याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 3 बांगलादेशी महिलांसह लॉज मॅनेजर सोमनाथ आणि वेटर शिवदयाल यांना ताब्यात घेऊन अटक केली होती.
मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला लॉज चालक रत्नाकर शेट्टी गेल्या ८ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्यातच रविवारी दुपारी रत्नाकर हा नित्या लॉजमध्ये आला असल्याची माहिती पोलीस हवालदार विजय बनसोडे यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोरे, पारधी आणि हवालदार विजय बनसोडे या पोलीस पथकाने नित्या लॉजमध्ये धाड टाकली. व रत्नाकर शेट्टीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास हवालदार बनसोडे करीत आहे.