पालघर - डहाणू- महाराष्ट्रातील भीमाशंकर गडाचे नाव घेता भल्या- भल्या ट्रेकर्सना घाम फुटतो. परंतु, डहाणूतील वडकुन येथल्या केशवी राम माच्छी या दोन वर्षे दहा महिन्याच्या चिमुकलीने केवळ अकरा तासात सतरा कि.मी. गडाची चढाई पूर्ण केली आहे. डहाणूतील गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपने 31 जुलै रोजी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले होते. याकरिता ३० जुलैच्या रात्री दहाच्या सुमारास खाजगी वाहनाने प्रवास सुरू केला. या ग्रुपसोबत वडकुन खेतीपाडा येथील आनंद माच्छी, पत्नी व बहीण, हे निघाले. मात्र, आपण सोबत येणार, असा हट्ट केशवीने धरला होता.
खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईला सुरुवात -केशवी काही ऐकाना म्हणून तिलाही सोबत घेतले. तिच्या एवढ्या लहान वयाचा विचार करता ती भीमाशंकर गडाची चढाई करेल का ? असा प्रश्न गडप्रेमी ग्रुप व तिच्या कुटुंबियांच्या मनात पडला. तिच्या चढाई बाबत सर्वांना शंका होती. सकाळी साडे दहाच्या वाजता केशवीने खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईला सुरुवात केली. गड प्रेमी ट्रेकर्स ग्रुप सोबत केशवीही चालत निघाली. या गडावर चढाईसाठी पायऱ्या नसल्याने काका, काकूचा तर कधी आत्या व बहिणीचा हात धरून ती चालू लागली. या प्रवासात केशवीला तिच्या कुटुंबीयांनी तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर गडावरील, हिरवी झाडे, छोटे धबधबे, पक्षी, माकड, पाहून जणू भुरळ पडल्याप्रमाणे ती शिखराकडे मार्गक्रमन करत होती.
धाडस व उत्साह पाहून कौतुक सुरू -श्रावणमास सुरू असल्याने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भक्तांची खूपच गर्दी होती. छोट्या केशवीचे धाडस व उत्साह पाहून त्यांच्याकडून कौतुक सुरू होते. त्यामुळे तिचा उत्साह वाढल्याने कोणतीही कुरबुर अथवा मदत न घेता गणेश घाटाच्या मार्गाने बारा वाजल्याच्या सुमारास केशवीने ८.७० कि.मी चढाई पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा दीड वाजता परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतरही ती स्वतः हून पुढे आली. तिचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गडाचा पायथा गाठताना ती थकली. मात्र, गडप्रेमी ग्रुपने तिला प्रोत्साहित केल्याने साडेसहाच्या सुमारास तिने एकटीने यशस्वीरीत्या भीमाशंकर गडाचे ट्रेकिंग पूर्ण केले. केशवीला गडावर चढाई करण्यासाठी सहा तास तर परत येण्यासाठी ५ तास तीस मिनिटे लागली. तब्बल १७ कि.मी. चा ट्रेक पूर्ण करण्यासाठी केशवीला अकरा तास तीस मिनिटांचा कालावधी लागला आहे.