ठाणे -मुंबई व परिसरात राहणारे नागरिक ठाण्यात आले की त्यांचे पाय वळतात ते तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या मामलेदार चमचमीत मिसळ खाण्याकडे. ठाण्याची मामलेदार मिसळ म्हणजे खवय्यांची मेजवानीच ठरत होती. तहसीलदार मिसळ ते ब्रॅण्ड मामलेदार मिसळ बनवणारे मालक लक्ष्मण शेठ मुरडेश्वर यांचे कोरोनाने निधन झाले. लक्ष्मण शेठ हे 84 वर्षाचे होते. तब्बल 1952 पासून लक्ष्मण शेठ यांचे वडील नरसिंह मुरडेश्वर यांनी तहसीलदार मिसळीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्यानंतर लक्ष्मण शेठ यांनी तहसीदार मिसळीचे ब्रँडिंग मामलेदार मिसळ करून प्रसिद्धी मिळवली.
तहसीलदार मिसळ ते मामलेदार मिसळ प्रवास -
तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी चविष्ट, ठसकेदार मिसळ खवय्यांना सातत्याने आक्रषित करते. या ठसकेदार मिसळीची चव ठाण्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या हॉटेलमध्ये खवय्यांना मिळत नाही. यामुळॆ ठाणे, मुंबई येथील नागरिक कामानिमित्त ठाण्यात आल्यानंतर खवय्ये मामलेदार मिसळचा आनंद घेतल्याशिवाय ठाणे सोडत नाहीत. त्यामुळे सकाळी नाश्ता तहसीलदार मिसळमध्ये मिळत होता. हळूहळू मिसळ दुपारचे जेवण झाले. त्यानंतर काहींचे संध्याकाळचे जेवणही मिसळ असायची. दिवसेंदिवस या हॉटेलमध्ये लोकं गर्दी करू लागली. त्यामुळे रांगा लावून मिसळ खाण्याचा आनंद नागरिक घेतात.
तिखट, मिडीयम तिखट आणि साधी मिसळ असे तीन मामलेदार मिसळचे प्रकार होते. झणझणीत मिसळमुळे तिखट लागणाऱ्या खवय्यांची गरज पाहून हॉटेलच्या बाहेर ताक सुरू केले. त्यालाही ठाणेकरांनी आणि खबय्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ठसकेदार मिसळ आणि ताक हे समीकरण मामलेदार मिसळची खासीयत आहे. अनेक वर्षं एकसारखी चव असलेली मिसळ ठाणेकरांचे आकर्षण ठरली.