ठाणे - कल्याण पश्चिम परिसरातील दुर्गाडी किल्ल्यानजीक असलेल्या महावितरण कंपनीच्या फिटरमध्ये एक कोब्रा भक्ष्य शोधण्यासाठी शिरला होता. यावेळी कोब्रा नागाने एका मोठ्या बेडकाला भक्ष्य केले.
महावितरण कंपनीच्या फिटरमध्ये शिरला कोब्रा हा प्रकार महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोरच घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर कोब्रा पाहून त्यांची फिटर जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. अखेर सर्पमित्रांना संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वार संस्थेचे सर्पमित्र हितेश यांनी घटनास्थळी पोहचून या कोब्रा नागाला शिताफीने पकडले आणि पिशवीत बंद केले. दरम्यान, नाग पकडल्याचे पाहून येथील वीज कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कल्याण पश्चिम परिसरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. यामुळे शेती जंगल नष्ट करून सिमेंटची जंगले उभी राहत आहेत याचा सर्वाधिक फटका बिळात राहणाऱ्या प्राणांना बसला आहे. यातच 20 दिवसांपूर्वी कल्याण परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अनेक सखल भागात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक विषारी आणि बिनविषारी सापांच्या बिळात पाणी शिरल्याने, अनेक सापांनी जिवाच्या भीतीने आणि भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत आश्रय घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या 20 दिवसात कल्याण पश्चिम परिसरातील विविध ठिकाणच्या मानवी वस्तीतून सर्पमित्रांनी 50 ते 60 विषारी व बिनविषारी सापांना पकडून जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कल्याण पश्चिम परिसरात विविध मानवी वस्तीतून सर्पमित्र हितेश याने विविध जातीच्या 14 सापांची सुटका करून त्यांना वनाधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडले आहे. याही सापाला कल्याणच्या वन अधिकाऱ्यांची परवानगीने उद्या गुरुवारी जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली.