ठाणे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आणि नवी मुंबई रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. कळवा पोलीस ( Kalwa police ) ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Ketki remanded in judicial custody for 14 days ) सुनावल्यानंतर आज ( मंगळवारी ) रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात देखील ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Sessions Court ) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर केतकीची रवानगी ( Ketki Chitale Controversy ) पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून स्मितहास्य पाहायला मिळाले. आजही वैद्यकीय तपासणी दरम्यान केतकीच्या चेहऱ्यावर बिंधास्तपण आणि स्मितहास्य पाहायला मिळाले.
काय आहे प्रकरण? :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केतकीचा शोध घेत असतांना केतकीला १४ मे रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील तिच्या राहत्या घरातून तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर केतकीला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी तिची पोलीस कोठडी मागितल्याने ठाणे न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. केतकीची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर केले असता ठाणे न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात केतकीवर २०२० साली अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने १९ मे रोजी रबाळे पोलिसांनी ठाणे कारागृहातून केतकीचा ताबा घेतल. याप्रकरणी पोलीस तपास करण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र या प्रकरणात तरी केतकीला जामीन मिळेल असे तिला आणि तिच्या वकीलांना वाटत असतांना ठाणे सत्र न्यायालयाने आज केतकीला रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि तिची रवानगी पुन्हा थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.