ठाणे - कल्याण डोंबिवलीत राहणाऱ्या मात्र मुंबईत कामाला कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवलीत प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. किंवा त्यांची व्यवस्था मुंबईतच करावी असे कल्याण डोंबिवली महापालिकेने ठरवले होते. मात्र या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोधा झाला. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. मात्र, कालच झालेल्या या निर्णयावर अचानक स्थगिती दिल्याने महापालिका प्रशासन आणि राज्य शासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातुन अन्यत्र अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची यापुढे मुंबईतील त्या त्या अस्थापना नजीक असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मंगळवारी दिली होती.
हेही वाचा...मुंबई, पुण्यातील दारुविक्रीबाबत चद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले...
कालपर्यंत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ७३ रुग्ण हे मुंबईतील विविध विभागातील कर्मचारी असून त्यांच्या निकट सहवासात असलेले २८ रुग्ण असल्याची माहितीही आयुक्त डॉ. सुर्यवंशींनी दिली होती. महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यामागे कल्याण डोंबिवली क्षेत्रातुन मुंबईतील अत्यावश्यक सेवेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अधिकारी कर्मचाऱ्यांची मुंबईतच राहण्याची सोय करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकप्रतिनिधी करत आहेत.