ठाणे - भिवंडी शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढलेली असल्याने कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून भूमिपूजन केले होते. आता उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून उद्घाटनावरून शिवसेना-भाजपा यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उड्डाणपुलाचे ऑनलाइन लोकार्पण करणार आहेत. मात्र, आज भाजपा आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह उड्डाणपुलाचे लोकार्पण केले आणि वाहनांना झेंडा दाखवत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला.
स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. कोरोना काळात बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांना दीड महिन्यापूर्वी तयार झालेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून कोरोनासाठी वेळ नसलेल्या मुख्यमंत्र्यांना ऑनलाइन लोकार्पणासाठीही वेळ मिळू शकला नसल्याने आम्ही उड्डाणपुलाचे लोकार्पण भिवंडीकर जनतेसाठी केले असून सेना सरकार जाणून बुजून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी महेश चौघुले यांनी केला आहे.