ठाणे -राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. असे असताना कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासन कारवाई करून नोटीसा बजावत आहे. तर काहींवर गुन्हे देखील दाखल होत आहेत. मात्र कोरोना नियमांचे राजकीय नेतेमंडळी किंवा मंत्र्यांकडून उल्लंघन केले जात असून, त्यांना मात्र कायदा-नियम लागू होत नाही का ? असा सवाल विचारला जात आहे. नुकतेच ठाणे जिल्ह्यात भाजपच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत कोरोना नियम पायदळी तुटवत गर्दी करण्यात आली असून हि जनआशीर्वाद यात्रा नव्हे, तर कोरोना फैलाव यात्रा असल्याचा टोला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.
जनआशीर्वाद यात्रा नव्हे, ही तर कोरोना फैलाव यात्रा, खासदार डॉ. शिंदेंचा टोला - भाजप जनआर्शीवाद यात्रा
ठाणे जिल्ह्यात भाजपच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत कोरोना नियम पायदळी तुटवत गर्दी करण्यात आली असून हि जनआशीर्वाद यात्रा नव्हे, तर कोरोना फैलाव यात्रा असल्याचा टोला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.
बुधवारी डोंबिवली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे जनतेशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांना जनआशीर्वाद यात्रेबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले कि, कोरोनाचे नियम हे सर्वसामान्य जनतेला वेगळे आणि राजकीय नेतेमंडळीना वेगळे असे चालणार नाही. कोरोना पसरू नये म्हणून सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. जर कोरोना नियमांचे पालन राजकीय पक्षांनी केले नाही, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. विशेष म्हणजे ठाण्यात आयोजित यात्रेसंदर्भात आयोजकांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु डोंबिवली अथवा कल्याणातील कुठल्याही पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हे दाखल झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जनआशीर्वाद यात्रेच्या नावाने लोकांची गर्दी -
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. असे असताना जन आशीर्वाद यात्रेच्या नावाने लोकांची गर्दी व्हावी आणि महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट यावी म्हणून अशा प्रकारच्या यात्रा काढल्या जात असल्याचा आरोप डोंबिवलीतील शिवसेनेचे नेते राजेश कदम यांनी केला आहे. तसेच अशा प्रकारच्या यात्रेला कोरोना वाटप यात्रा म्हणावे लागेल, असाही खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.