ठाणे- कल्याणच्या तरुणीने देशवासियांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अमेरिकेजवळील एल सालवाडोर या देशात झालेल्या ‘मिस टिन वर्ल्ड’ 2019 सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या सुष्मिता सिंगने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मास मीडियाची विद्यार्थिनी असणाऱ्या सुष्मिताने आपल्या तल्लख बुद्दी, आत्मविश्वास आणि हजरजबाबीपणाच्या बळावर सर्वांना मागे टाकत भारताची मान उंचावली. या स्पर्धेतील स्पर्धकांचा स्वभाव, बुद्धीमता, संवाद कौशल्य, फॅशन, आरोग्य आणि सौंदर्य आदी घटकांचा विचार केला जातो. या स्पर्धेच्या 8 दिवसात या तरुणींना तेथील सामाजिक-सार्वजनिक कार्यक्रमात, फोटोशूट्स अशा विविध उपक्रमात सहभागी करून घेण्यात येते. त्यानंतर शेवटच्या प्रश्नोत्तराच्या टप्प्यामध्ये परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर तिने जे उत्तर दिले, त्या उत्तराने उपस्थितांच्या मनाबरोबरच स्पर्धेचा किताबावरही आपले नाव कोरले.
तू जिंकलीस तर तुझ्यातील सेवाभावाचे जगाला कसे दर्शन घडवशील ? या प्रश्नावर बोलताना ती म्हणाली की, “मला सांगण्यात आलं होतं की मी सुंदर नाहीये. पण मी अथक परिश्रम केले आणि माझ्या स्वतःसाठी आत्मविश्वासाने उभी राहिले. म्हणूनच या जगातील मुलींसाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करणारी एक प्रेरणा म्हणून मला जगायला खूप आवडेल” हे सुश्मिताने दिलेले उत्तर ऐकून परीक्षक अक्षरशः स्तब्ध झाले.
दरम्यान, सुश्मिताने नोएडा, दिल्ली राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या हुशारीची चुणूक दाखवत मिस टिन इंडिया वर्ल्ड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. भारतात ही स्पर्धा जिंकल्यानंतर सुश्मिताची अमेरिकेतील लॅटीना येथील मिस टिन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. 18 ते 27 मे या काळात पार पडलेल्या सदर स्पर्धेत 30 देशांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 6 जणींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात झाली होती. अंतिम फेरीत सुष्मिताने या स्पर्धेत आपल्या हुशारी, हजरजबाबीपणा आणि सौंदर्याच्या जोरावर जागतिक स्तरावर मानाचा समजल्या जाणाऱ्या मिस टीन वर्ल्ड किताबावर आपला ठसा उमटवला. सुष्मिताच्या या जागतिक स्पर्धेतील यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.