नवी मुंबई- नवी मुंबईत भाजपचे नगरसेवक हे राष्ट्रवादी व शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. महाविकासआघाडी सरकारवर पोलीस बळाचा उपयोग नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दुसऱ्यांच्या पोराला आपले म्हणायची भाजपची जुनी खोड आहे. ते वाशी येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा मेळावा रविवारी वाशी येथे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुळात भाजप नेते आमदार गणेश नाईक जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा नवी मुंबई मनपाच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यानंतर काही कालावधीनंतर सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गणेश नाईकांना सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीमध्ये येणारे नगरसेवक हे त्यांचे नगरसेवक नाहीत. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झालेले नगरसेवक आहेत. दुसऱ्याच्या पोराला मांडीवर घेऊन आपले म्हणायची ही भाजपची जुनी पद्धत आहे.