ठाणे -उल्हासनगरमधील एका बांधकाम व्यवसायकाकडून खंडणी घेताना एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. व्यवसायिकाच्या कार्यालयात हा खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्ता ४० हजारांची खंडणी घेत होता. हा सर्व प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या कार्यकर्त्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश खटवानी (वय, २९ रा. प्रेमटेकडी, उल्हासनगर ) असे खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे.
हेही वाचा... कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा
राजेंद्र श्रीखंडे या व्यवसायिकाचे उल्हासनगरमधील अयोध्यानगर येथे जयभोले कन्स्ट्रक्शनचे कार्यालय आहे. श्रीखंडे यांनी महापालिकेची परवानगी घेऊन इमारतीचे बांधकाम केले. मात्र, परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम केल्याने खटवानी याने त्यासंदर्भात पालिकेच्या नगररचना विभागात माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज दाखल करून माहिती मागवली. त्या माहितीच्या आधारे नितेश खटवानी याने तक्रार दाखल केली होती. हीच तक्रार मागे घेण्यासाठी त्याने राजेंद्र श्रीखंडे यांचेकडे १ लाखांची खंडणी मागितली होती. मात्र तडजोडी अंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते.