ठाणे - कल्याणच्या बहूचर्चित पत्रीपुलाच्या उदघाटनाला गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या तारीख पे तारीखचा सिलसिला संपला असून या पत्रीपूलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा २५ जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे. विशेष म्हणजे पुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. आता २५ तारखेला उद्घाटन होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या तीनच दिवसानंतर कल्याण-शीळ मार्गावरील होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
आधी दिली होती मार्च २०२१ तारीख
या वर्षातील मार्च महिन्यात नवीन पत्रीपुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याची शक्यता सरकारी यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपा व मनसेने आगामी होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वीच वर्षभरापासूनच पत्रीपुलाच्या कामावरून सत्ताधारी शिवसेनेविरोधात जोरदार आंदोलने करून टीका केली. तसेच पालिका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा करण्याच्या तयारीत विरोधक होते. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच या पुलाचे उद्घाटन करून शिवसेनेने विरोधकांची गोची केल्याचे बोलले जात आहे.
उरल्या नाममात्र आठवणी
१९१४साली बांधण्यात आलेला पत्रीपुलाच्या यापुढे नाममात्र आठवणी उरल्या आहे. विशेष म्हणजे कल्याण-शिळफाटा रस्त्यातील रेल्वे मार्गावर असलेला हा बहुचर्चित पत्रीपूल १०४ वर्षे जुना व धोकादायक झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १८ नोव्हेंबर २०१८ला मेगाब्लॉक घेऊन हा पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. या पूल उभारणीच्या कामाला दोन वर्षे लागली आहे. त्यातच संबंधित विभागासह शिवसेनेकडूनही अनेकदा पुलाच्या काम लवकरच संपून वाहतुकीसाठी खुला करण्याकरिता "तारीख पे तारीख' देण्यात आली. मात्र दोन वर्षांपासून कल्याण-शीळ मार्गावर पत्रीपुलामुळे होणारी वाहतूक तीन दिवसात फुटणार असल्याने दोन वर्षापसून वाहतूककोंडीचा सामना करणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.