ठाणे - कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. पित्याला लागलेले दारूचे व्यसन आणि आई मानसिक रुग्ण असल्याने वैतागलेल्या मुलाने पित्याची हत्या व आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्यानंतर या हत्याकांडाचा तपास करणारे पोलीस काही काळ हबकले होते. लोकेश बनोरिया ( वय 27 ) असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. आधी वडिलांनीच आपल्यासह आईवर हल्ला करून स्वतः आत्महत्या केली, असा बनाव करणाऱ्या लोकेशला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा -Meera Bhynder Crime : आमदार गीता जैन यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक
वडिलांची जागीच हत्या तर, आईचा उपचारादरम्यान मृत्यू
कल्याण पश्चिमेतील रामबाग परीसरातील निखिला हाईट्स या इमारतीत राहणारे सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन प्रमोद बनोरिया यांच्यासह त्यांची पत्नी कुसूम आणि मुलगा लोकेश जखमी अवस्थेत आढळून आले होते. प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, कुसूम या गंभीर जखमी होत्या. वडिलांनी मला व आईला जखमी करून स्वत: आत्महत्या केली आहे, अशी माहिती लोकेशने प्राथमिक तपासात पोलिसांना दिली होती. मात्र, लोकेशच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास नव्हता. पोलिसांनी जखमी आई कुसूम आणि लोकेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी तपासचक्रांना वेग दिला. गंभीर जखमी असलेल्या लोकेशच्या आईने लोकेश खोटे बोलत असल्याचे सांगितले. गेल्याच शनिवारी कुसूम यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.