महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane News: ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात वेगवेगळ्या अनेक घडामोडी घडल्या आहेत. जाणून घ्या ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरुपात (Thane News in brief).

Thane News
Thane News

By

Published : Oct 13, 2022, 3:50 PM IST

ठाणे:जाणूनघ्याठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी संक्षित स्वरुपात.

1. ढाल तलवार निशाणी मिळाल्यावर शिंदे गटाचा जल्लोष


ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम (Anand Dighe ashram) येथे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. आज निवडणूक आयोगाने ढाल तलवार ही निशाणी दिल्याने आपल्याला शिवछत्रपतींच्या आशीर्वादासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी व्यक्त केली. ढाल तलवार चिन्ह घेऊन जेव्हा कडवट शिवसैनिक रस्त्यावर उतरेल तेव्हा सत्ता सहज काबीज करु. बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे आमचे नेते आणि कार्यकर्ते ढाल तलवार ही निशाणी घेऊन बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेतील आणि विजय देखील खेचून आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 40 आमदार 12 खासदार सर्व ठिकाणचे नगरसेवक आणि असंख्य शिवसैनिक आमच्याच सोबत असून ढाल तलवार हे तात्पुरते चिन्ह गोठविल्या नंतर पुन्हा एकदा शिवसेनेचे अधिकृत असलेले धनुष्यबाण हे चिन्ह देखील आम्हालाच मिळावं हा आमचा नैसर्गिक अधिकार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

शिंदे गटाचा जल्लोष

2. ठाणे शहरात पाहायला मिळाले इंद्रधनुष्य

ठाणे: मागील काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे ठाण्यातील वातावरणात गारवा झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे ठाण्यात इंद्रधनुष्य पाहायला मिळाले. (rainbow in thane). हे दृष्य टिपण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. इंद्रधनुष्य पाहण्याचा आनंद घेताना अनेक प्रवासी आपल्या मोबाईल मधून हे इंद्रधनुष्याचे स्वरूप रेकॉर्ड करत होते. ठाणे शहरात अशा प्रकारे इंद्रधनुष्य पाहण्याचा योग फार कमी येत असल्याने नागरिकांनी या वातावरणाचा पुरेपुर आनंद घेतला.

ठाणे रेल्वेस्थानकावर इंद्रधनुष्य टिपण्यासाठी गर्दी

3. जिल्ह्यातील कुंभारवाड्यांत दिवाळीसाठी पणत्या बनवायची लगबग सुरु

ठाणे: जिल्ह्यातील विविध कुंभारवाडय़ातली दिवाळी महिन्याभरापूर्वीच सुरु होऊन घरोघरी दिवाळीत उजळणारे दिवे, पणत्या तयार करण्याचे काम सुरु आहे. परंतु यंदा सतत होत असलेल्या पावसामुळे कुंभाराच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. (potter business in Thane). एकीकडे वाढती महागाई, त्यात मातीची आणि सजावटीच्या साहित्याची वाढलेली किंमत यामुळे या व्यवसायात मेहनत करूनही उदरर्निवाह करणे कठीण झाले आहे.

दोन वर्षे कोविडमुळे ठप्प असलेल्या कुंभार व्यवसायाचे नुकसान अद्यापही भरून निघालेले नाही. यंदा मात्र सर्व सण-उत्सव कोणत्याही निर्बंधविना साजरे होत असल्याने जिल्ह्यातील कुंभार समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र ऑक्टोबरचा अर्धा महिना उजाडला तरी अद्याप पाऊस काही जाण्याचे नाव घेत नसल्याने कुंभार वाड्यातील व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या काळात चांगला व्यवसायाची आशा निर्माण झाली आहे. यावर्षी पणत्याना चांगली मागणी देखील आहे. परंतु लांबलेला पाऊस व्यवसायावर पाणी फिरवतो की काय, ही भीती सध्या कुंभार समाजाला सतावते आहे.

पणत्या

4. ठाणे रेल्वे स्थानाकात फेरीवाल्यांनी केली महिला प्रवाशाला मारहाण

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकात (Thane railway station) काही दिवसांपूर्वी एका महिलेसोबत मारहाणीचे प्रकरण घडले होते. ही मारहाण ठाणे रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांनी (hawkers on thane railway station) केली असून या फेरीवाल्यां विरुद्ध ठाणे लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना कोर्टात सादर करून त्यांना कोर्टाने जेल कोठडी सुनावली आहे.

या घटनेनंतर आरोपी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रस्त महिलेने केली होती. तर फेरीवाल्यांची दादागिरी वाढलेली असून रेल्वे पोलिसांनी या फेरीवाल्यांवरती त्वरित कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात दोन फेरीवाल्यांना अटक केली असून रेल्वे स्टेशन परिसरातील संपूर्ण परिसरात हा ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. तसेच सदर रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा गस्त वाढवून या ठिकाणी नागरिकांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आधीची काळजी घेतली जाणार असल्याचे यावेळी लोहमार्ग पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावरील फेरीवाले

5. अवकाळी पावसाच्या भीतीने वीटभट्टी व्यवसायिक द्विधा मनस्थितीत


ठाणे: जिल्ह्यात शेतीला पूरक जोडधंदा व्यवसाय म्हणून वीटभट्टी व्यवसायाचा (brick kiln business in Thane) अवलंब बहुतांश शेतकरी करतात. या व्यवसायामध्ये वीटभट्टी मालकांना वार्षिक चांगला बक्कळ नफा मिळत असतो, मात्र गत दोन-तीन वर्षांपासून पावसाळी ऋतूची अनियमितता आणि अवकाळी पडणाऱ्या पावसाने वीटभट्टी व्यवसायिकांना द्विधा अवस्थेत टाकले आहे. शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करून कर्जबाजारी होऊन दागिने गहाण ठेवून वीटभट्टी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत. तर वीटभट्टीवर हातावर पोट धरून पालघर जिल्ह्यातील विविध आदिवासी पाड्यातील आदिवासी मजूर वीटभट्टीवर मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करत असतात. त्यामुळे त्यांनाही अवकाळी पावसाच्या भीतीने आर्थिक नुकसान होऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता भेडसावत आहे.

गतवर्षी बहुतांश वीटभट्टी व्यावसायिकांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यवसायाचा मुहूर्त केला होता. यावर्षी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्याने वीटभट्टी व्यवसायिक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यवसायाचा मुहूर्त करावा की टाळावा या पेचात पडला आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची दाट शक्यता असून शेतकऱ्यांसमोरही उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकणार आहे.

दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर वीटभट्टी व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याबाबत कोकण विभागीय वीट उत्पादक व ट्रक चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शंकर गोराडकर यांना विचारले असता, सद्यस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या सावटामुळे दिवाळीनंतर २० दिवसांत वीटभट्टी व्यवसाय सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच वीटभट्टीवर काम करणारे पालघर जिल्ह्यातील विविध पाड्यातील मजूरांनाही रोजंदारीवर दिवाळी नंतरच पाचारण करणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टी व्यवसाय

6. ठाणे पालिकेच्या तिजोरीत अवघे ६५ कोटी शिल्लक

ठाणे:ठाणे शहरात नवनविन विकासकामे सुरु असली तरी ठाणे महापालिकेच्या (Thane municipal corporation) तिजोरीत अवघे ६५ कोटीच शिल्लक असल्याचे समोर आले आहे. कोरोना सरल्यानंतर उत्पादनात वाढ झाली असली तरी दायित्वाचा भार कमी होत नसल्याने जमाखर्चाचा मेळ घालताना ठाणे महापालिकेला कसरत करावी लागत आहे. कोरोना काळात चार हजार कोटींच्या आसपास असलेले दायित्व सद्यास्थितीत सुमारे २८०० कोटी रुपयांवर आले आहे. तेव्हा मागील आर्थिक वर्षातील पाचशे ते सहाशे कोटींची ठेकेदारांची देयके कशी द्यायची? असा पेच प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

ठाणे महापालिकेने २०२२-२३ या वर्षात ३३८४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. गेल्या सहा महिन्यात पालिकेच्या तिजोरीत विविध करापोटी ७४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्य शासनाकडून वस्तु व सेवा कर आणि मुद्रांक शुल्कापोटी ५०२ कोटी मिळाले आहेत. तर, शहर सुशोभिकरण, रस्ते तसेच काही प्रकल्पांसाठी ३७० कोटी रुपयांचे अनुदान पालिकेला राज्य शासनाकडून मिळालेले आहे. एकीकडे पालिकेच्या उत्पन्न वसुली वाढ झालेली दिसत असली तरी हे पैसे दायित्वाच्या भारावर खर्च होत आहेत. कोरोना काळात पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने पालिकेवर ४००० कोटी रुपयांचे दायित्व होते.

ठाणे महानगरपालिका

7. ठाण्यातील कोळीवाडा शाखेत शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने

ठाणे:दसरा मेळाव्याचा जागेवरून सुरू झालेले शिवसेनेच्या दोन्ही गटांचे भांडण आता शाखे पर्यंत पोहचले आहे. (Shinde vs Thackeray in thane). ठाणे पूर्व येथील शाखेला याच वादातून अखेर टाळे लावून चाव्या दोन्ही गटाच्या नेत्यांना सोपविण्यात आल्या आहेत. ठाण्यातील मनोरमानगर येथे झालेल्या शाखा मालकीच्या वादानंतर आज दोन्ही गट ठाणे पूर्व कोळीवाडा येथील शाखेत आमनेसामने आले. सदर शाखेला तोडण्याची अफवा उद्धव गटातील कार्यकर्त्यांच्या कानावर आल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. सदर शाखेची पुनरबांधणी करावी असे शिंदे गटाचे म्हणणे होते तर शाखेची डागडुजी गेल्याच वर्षी झाल्याने त्याची गरज नसल्याचे मत उद्धव गटाने व्यक्त केले. शाखा कोणाचीच खाजगी मालमत्ता नसून शिवसेनेच्या भगव्या खाली दोन्ही गटांनी जनतेची कामे करावीत व आपल्या ठरवून दिलेल्या वेळी शाखेत बसावे असा तोडगा पोलिसांतर्फे काढण्यात आला. पोलिसांनी कडक बंदोबस्त लावून परिस्थिवर नियंत्रण मिळविले आहे.

कोळीवाडा शाखेत शिवसेनेचे गट आमनेसामने

ABOUT THE AUTHOR

...view details