ठाणे : पत्नी वारंवार फोनवर बोलत असल्याने तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार करीत पत्नीच्या गुप्तांगावर बियरच्या बाटलीने जखमा करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शहापूर तालुक्यातील बिरवाडी परिसरात घडली होती. याच गुन्ह्यातील आरोपी पतीला पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संतोष शेळके असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
मृत सुनीता आणि आरोपी पतीचा 20 वर्षापूर्वी विवाह : मृत सुनीता संतोष शेळके (४०) हिचा विवाह १९९४ साली बिरवाडीत राहणाऱ्या आरोपी संतोषशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. त्यातच २०१७ पासून पती कामधंदा करीत नव्हता शिवाय त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे मृत पत्नीवर २०१८ पासून कुटुंबाच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी आली. त्यामुळे ती बिरवाडीजवळच असलेल्या एका भगर मिलमध्ये कामाला जात होती.
चारित्र्यावर निष्कारण संशय : त्या कामानिमित्त मृत सुनीता वारंवार फोनवर बोलत असून, आपल्याला बघून फोन बंद करते, असा संशय आरोपी पती संतोषच्या मनात होता. या कारणास्तव तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने ३० एप्रिल २०१८ रोजी पत्नीला बहाण्याने दुपारच्या सुमारास गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ बोलवून तिच्याशी दोन वेळा शरीर संबंध ठेवले. त्यानंतर बियरच्या काचेच्या बाटली फोडून तिच्या गुप्तांगाच्या भागावर जखमा करून तिच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर संतोषनेच त्या रात्री घरी पत्नी आली नसल्याचा कांगावा केला होता.