ठाणे - घरगुती वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकू भोसकून हत्या केली. यानंतर, मुलीला देखील जखमी केल्याची खळबळजनक घटना कल्याणच्या ठाणकर पाड्यात घडली आहे. मनीषा महाजन (वय ४५) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर, मुलगी गौरवी (वय २५) असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
किरकोळ वादातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या; लग्न ठरलेल्या मुलीवरही जीवघेणा हल्ला - हत्या
पत्नी मनीषा हिच्या पोटात चाकू भोसकला. तर आईला वाचविण्यासाठी आलेल्या गौरवीच्या गळ्यावर व पायावर हल्ला केला. जीवघेण्या हल्ल्यामुळे पत्नी मनीषा ही रक्ताच्या थारोळ्यात तडफडून जागीच मृत झाली.
कल्याण पश्चिमेकडे ठाणकर पाडा परिसरात मोहन महाजन हा त्याची पत्नी मनीषा व मुलगी गौरवी सोबत राहतो. मोहन हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. मोहनची मुलगी गौरवी हिचे ८ मे रोजी लग्न ठरले आहे. बुधवारी रात्रीच्या साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोहनचा पत्नीसोबत वाद झाला. याच वादातून संतापलेल्या मोहनने चाकूने हल्ला केला. पत्नी मनीषा हिच्या पोटात चाकू भोसकला. तर आईला वाचविण्यासाठी आलेल्या गौरवीच्या गळ्यावर व पायावर हल्ला केला. जीवघेण्या हल्ल्यामुळे पत्नी मनीषा ही रक्ताच्या थारोळ्यात तडफडून जागीच मृत झाली. तर मुलगी गौरवी ही गंभीर जखमी झाली. गौरवीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर हल्लेखोर मोहन महाजन फरार झाला आहे. मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव टाकण्यावरून झालेल्या वादात त्याने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.