ठाणे -मुस्लीम वस्त्यांतील शाळा बंद झाल्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशी ३८ टक्के मुले बालमजुरीकडे वळाल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते, खासदार हुसेन दलवाई यांनी केला. ते भिवंडीमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
हुसेन दलवाई हे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी भिवंडीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भिवंडीतील मुस्लीम बांधवाच्या शैक्षणिक प्रश्नांवर प्रकाश टाकला.
भिवंडी शहरात साडेचार ते पाच लाखांच्या जवळपास मुस्लीम धर्मियांची संख्या आहे. तर भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात सुमारे ५० च्या आसपास ऊर्दू प्राथमिक शाळा आहेत. यापैकी बहुतांश ऊर्दू शाळा राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे बंद अवस्थेत असल्याचा आरोप खासदार दलवाई यांनी केला.
विधानपरिषद व राज्यसभेत उर्दू शाळा बंद का हा अनेक वेळा मुद्दा उपस्थित केला. मात्र, आजही भिवंडीतील गरीब मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ज्या वयात शिक्षणाची , खेळण्याची, बागडण्याची आणि पुस्तक वाचण्याची इच्छा मुलांना असते. या वयात बालमजूर मुलांना राबविले जात असल्याने हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. आमचे सरकार आल्यास बंद अवस्थेतील शाळा पुन्हा खुल्या करून शिक्षणाचे दारे उघडे करून देऊ, असे त्यांनी आश्वासने दिले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही आमच्या सरकारच्या काळात सुगीचे दिवस येतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.