महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जीवाशी खेळ ! कोरोनाचा संसर्ग नसतानाही रुग्णालयाचा महिलेवर महागडा उपचार, नातेवाईक म्हणाले . . . . - ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्ण

फसवेगिरी करणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन इंफेक्स्न लॅब, सिटी क्रिटीकेअर हॉस्पिटल, ए अँन्ड जी हाॉस्पिटल यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्र्यांकडे निवदेनाद्वारे केली आहे.

Thane
महिला रुग्ण

By

Published : Jul 9, 2020, 9:49 PM IST

Updated : Jul 9, 2020, 9:56 PM IST

ठाणे- कल्याणातील एका खासगी रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाची लागण नसलेल्या महिलेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून महागडे उपचार सुरू होते. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर दोन्ही खासगी रुग्णालय आणि लॅबने एकमेकांकडे बोट दाखवत जवाबदारी झटकली आहे. याप्रकरणी दोषी असलेली रुग्णालये आणि लॅबविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथे राहणारे अजय सावंत यांची बहीण नीता सावंत यांना बरे वाटत नसल्याने ३ जुलै रोजी त्यांना सिटी क्रिटीकेअर या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ४ जुलै रोजी कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी ५ जुलैला पॉझिटिव्ह आल्याचे सांगत महिलेला तातडीने कल्याण पश्चिमेतील ए अँन्ड जी या कोवीड रुग्णालयात नेण्यास सांगितले.

कोरोनावरील उपचारासाठी महागड्या इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांचे लाखो रुपये खर्च

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेला ए अँड जी रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात ४५ हजार किंमतीचे इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना सांगितले. मात्र कल्याणात इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मोठ्या कसरतीने इंजेक्शन मुंबईहून आणले. ते इंजेक्शन रुग्णाला दिल्यानंतर ३५ हजार किंमतीचे ६ इंजेक्शन आणण्यास सांगितले. तेदेखील मोठ्या तारेवरची कसरत करत नातेवाईकांनी उपलब्ध करुन दिले.

अहवाल दुसऱ्या रुग्णाचा असतानाही कोरोनाचे उपचार
यानंतर रुग्णालयाने पुन्हा ४५ हजार रुपयांचे इंजेक्शन आणण्यास सांगितले. ते आणण्यासाठी औषधी दुकानदाराने कोरोना चाचणीचा अहवाल लागत असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. ए अँन्ड जी या रुग्णालयाकडून डॉक्टरने लिहून देलेल्या औषधाची झेरोक्स प्रत दिली असता दुकानदाराने चाचणी अहवाल हा दुसऱ्या रुग्णाचा असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महिलेला पेशी कमी झाल्याने मीरा रुग्णालयात दाखल केले आहे. महिलेची प्रकृती स्थिर आहे.

कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी
फसवेगिरी करणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन इंफेक्स्न लॅब, सिटी क्रिटीकेअर हाॉस्पिटल, ए अँन्ड जी हाॉस्पिटल यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी अजय सावंत यांनी आरोग्य मंत्र्यांकडे निवदेनाद्वारे केली आहे. सिटी क्रिटिकेयर रुग्णालय प्रशासनाने मात्र त्या रुग्णावर योग्य उपचार केल्याचा दावा केला आहे. लॅबकडून आलेल्या अहवालानुसार रुग्णाला उपचारासाठी कोविड रुग्णालयात पाठवल्याचे प्रशासनाने सांगितले.


याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रारीचे निवेदन प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. योग्य ती शहानिशा व कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकरी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी शहानिशा करुन कारवाई करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, कोरोना महामारीत गेल्या तीन महिन्यापासून खासगी रुग्णालयांनी नागरिकांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू केली आहे. यामुळे राज्य सरकारने या खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर पायबंद घातला पाहिजे, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Last Updated : Jul 9, 2020, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details