ठाणे- लक्षणे नसलेले परंतु घरीच उपचार करत असलेल्या रुग्णावर आता ठाणे महापालिका वॉच ठेवणार आहे. तसेच गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या दोन्ही हातावर महापालिका शिक्का मारणार असून अशा रुग्णांनी चुकून ही बाहेर पडू नये, असा निर्वाणीचा इशाराच ठाणे महापालिका प्रशासनाने दिला आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशनानुसार राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून 70 टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. अशा रुग्णांवर लक्ष ठेवले जात असून त्यांना घरच्या घरी वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. मात्र, काही रुग्णांच्या एका हातावर शिक्का मारून देखील एक हात लपवून असे रुग्ण बाहेर पडत असतात, त्यामुळे संसर्ग वाढत आहे. आता मात्र अशा रुग्णाच्या दोन्ही हातावर शिक्का मारण्यात येणार आहे.
ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रामुख्याने उच्चभ्रू इमारतीमध्ये रुग्णांची संख्या जास्त असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे लक्षणे नसलेले आणि घरीच राहूनच उपचार घेत असलेले करोना रुग्ण ठाण्यात आहेत. यांना ओळखता यावेत तसेच या रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे शहरात करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका प्रशासनाने अशा रुग्णांच्या दोन्ही हातावर शिक्का मारण्याचा निर्णय महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
कान उघाडणी झाल्यावर पुन्हा सुरुवात
हातावर शिक्का मारण्याची पद्धत ही गेल्या वर्षीपासून आहे. मात्र, मधल्या काळात कोरोना कमी झाला होता. तसेच महापालिकेकडे शाई उपलब्ध नसल्याने त्यामुळे ही पध्दत बंद करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी कानउघडणी केल्यानंतर शाईची पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता होम कॉरंटाईन असलेल्या प्रत्येक रुग्णाच्या दोन्ही हातावर शाई लागणार असल्याचे यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.