ठाणे - गुजरात - राजस्थानहून भिवंडीत आलेला विविध कंपन्यांचा 1 कोटी 67 लाखांच्यावर किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन व मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त टाकलेल्या धाडीत जप्त केला. कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांसह मालमत्ता पथकातील पोलिसांनी चार टेम्पो जप्त करत तीन चालकांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करीत त्यांना अटक केली आहे. तर, कंटेनर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -VIDEO: भाईंदरमध्ये कोरोना नियमांना हरताळ, गरब्यात तुडुंब गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल
खबऱ्यामुळे लाखोंच्या गुटख्याचे घबाड उघड
महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही शेजारील गुजरात राज्यातून विविध मार्गे कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात असल्याची गुप्त माहिती अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांना मिळाली होती. माहितीनुसार भिवंडीत एक कंटेनर व चार टेम्पोमधून लाखोंची गुटखा वाहतूक केली जाणार असल्याची खात्री पटली. तीच माहिती ठाणे गुन्हे शाखेतील मालमत्ता गुन्हेच्या पथकालाही हाती लागली होती.
रस्त्यावर पाळत ठेवून पकडले चारही टेम्पो
खबऱ्याच्या माहितीनंतर अन्न सुरक्षा अधिकारी रा. सि. बोडके, एम. ए. जाधव तसेच, मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथील सहा. पोलीस निरीक्षक मिलीन पिंगळे, पो. उप निरी. रविंद्र दळवी, यांच्या संयुक्त पथकाने भिवंडीतील अंजूरफाटा खारबाव रस्त्यावर पाळत ठेवून भिवंडी शहराच्या दिशेने येणारे चार टेम्पो अडवले. त्यांनतर चालकाकडे वाहनाची कागदपत्रे व टेम्पोत असलेल्या मालाची चौकशी सुरू केली. मात्र, चालक समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने टेम्पोतील मालाची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण 63 लाख 30 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आढळून आला. या कारवाईदरम्यान एक टेम्पो चालक तेथून पसार होण्यात यशस्वी झाला, तर तीन चालकांना ताब्यात घेण्यात आले.
कंटेनर चालक घटनस्थळावरून पसार
ताब्यात घेतलेल्या टेम्पो चालकांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुटखा भिवंडी तालुक्यातील कालवार येथील श्री शुभम इंडस्ट्रीयल पार्कमधील गोदामासमोर उभे असलेल्या वाहनातून भरल्याचे सांगितले. त्यांनतर दोन्ही पथकाने लागलीच त्या ठिकाणी धाव घेत तेथे उभे असलेल्या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये 1 कोटी 3 लाख 93 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. मात्र, पोलीस आल्याची कुणकुण लागताच कंटेनर चालकाने घटनस्थळावरून पोबारा केला. हा सर्व मुद्देमाल व चार टेम्पो, एक कंटेनर जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांनी टेम्पो चालकांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत टेम्पो चालक रवी भद्रीया नायक, मोहम्मद हनिफजमिल अहमद शेख (रा.भिवंडी) व शंकर पुकीर रजक (रा. कामण ता. वसई) या तीन टेम्पो चालकांना अटक केली.
2 कोटी 1 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मागील पंधरा दिवसांतील ही तिसरी मोठी कारवाई असून या कारवाईत 1 कोटी 67 लाख 23 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व 34 लाख किमतीची एकूण पाच वाहने, असा एकूण 2 कोटी 1 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले असून या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -भुरट्या चोरांनी मारला खाद्य तेलाच्या डब्ब्यासह दुधांच्या कॅरेटवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद