महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

15 ऑगस्टनंतर सर्व आस्थापने सुरू ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्णय, व्यापाऱ्यांना सहकार्याचे आवाहन - ठाणे ऑनलाईन गणेश विर्सजन

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व्यापाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले. त्यांनी 15 ऑगस्टनंतर सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. शिंदे यांच्या हस्ते गणेश विसर्जन मोबाईल अ‌ॅपचे उद्घाटनही झाले.

एकनाथ शिंदे पालकमंत्री ठाणे
एकनाथ शिंदे पालकमंत्री ठाणे

By

Published : Aug 14, 2020, 1:38 PM IST

ठाणे - 'कोरोना, कोविड-19 चे संकट अदयापही टळलेले नाही. ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे,' असे राज्याचे नगरविकास मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी 15 ऑगस्टनंतर शहरातील P1 व P2 नुसार ज्या आस्थापना सुरू होणार आहेत, त्या सर्व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 पर्यंत सुरू ठेवण्याविषयी आढावा घेतला. तसेच, मॉल्स, मार्केटस्, जीम व स्वीमिंग पूलबाबत माहिती घेवून त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. यावेळी शिंदे यांच्या हस्ते विसर्जन बुकिंग टाईम स्लॉट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत बोलताना कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे

ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही बैठक झाली. 'कोविड-19 चे संकट अद्यापही टळलेले नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे, ही वस्तूस्थिती असली तरी प्रत्येकाचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची आवश्यकता आहे,' असे त्यांनी सांगितले.

'गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. या कालावधीत गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच मास्क लावणे, योग्य अंतर राखणे, दुकानामध्ये काम करणाऱ्या सर्वांची चाचणी करणे या बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे,' असे ते म्हणाले. 'राज्य शासनाने, तसेच महापालिका प्रशासनाने ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत, त्यांचे पालन होईल,' याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापाऱ्याची असेल,' अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

'ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुपटीचा वेगही 90 दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे 3.5 टक्क्यांवरून 3.2 टक्क्यांवर आले आहे. ठाणे महापालिका सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे,' असे सांगून शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि पालिका प्रशासनाचे कौतुक केले.

तथापि, मॉल्स, मार्केटस्, स्वीमिंगपूल, जीमबाबत प्रशासनाने आढावा घ्यावा व त्यानंतर त्याचा निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते डीजीठाणे प्रणालीव्दारे ऑनलाईन गणेश विर्सजन बुकिंग स्लॉट सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.

महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी लॉकडाऊनचा निर्णय हे नागरिकांच्या भल्यासाठीच घेतला होता, असे सांगून लॉकडाऊन बंद केल्यानंतर व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यापारी संघटनांनी सर्व आस्थापना सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीनंतर महापालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट करून याबाबत आपली भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोरोनाविषयी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस खासदार राजन विचारे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details