ठाणे- नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या क्वारंटाईन सेंटर्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी न्यू होरायझन स्कूल येथे कोरोना कोव्हिड 19ची लक्षणे नसलेल्या बाधित रूग्णांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सेंटर्सचीही पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल होते.
प्रारंभी शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयास भेट दिली. ज्ञानसाधना महाविद्यालय येथे महापालिका जवळपास 350 ते 400 खाटांची क्षमता असलेले क्वारंटाईन सेंटर उभारत आहे. या सेंटर्सची पाहणी करून त्यांनी त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची तत्काळ पुर्तता करण्याच्या सूचना दिल्या. याठिकाणी तात्पुरती शौचालये निर्माण करून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसौय होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले.